🕒 1 min read
मुंबई : गेले दोन महिने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने तीव्र आंदोलने करत महाविकास आघाडीला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. अखेर दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत राज्य सरकारने राज्यातील प्रार्थनास्थळे नियमांसह सुरु करण्यास परवानगी दिली व श्रेयवाद सुरु झालेला पाहायला मिळालं.
यानंतर, प्रामुख्याने बिहारी जनतेमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या छठ पूजेनिमित्त राज्यात समुद्र वा नदी किनारी भाविकांना पूजा करण्यास परवानगी द्यावी यासाठी देखील भाजपने आंदोलनं केली. मात्र, दिल्ली सारखा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने परवानगी नाकारली. तर, काही राज्यात हा वाद न्यायालयात गेल्यानंतर सण-उत्सवापेक्षा जीव वाचणे महत्वाचे असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांना देखील न्यायालयाने फटकारले.
आता, याच सर्व मुद्द्यांवरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण भाजपचे आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
सामना रोखठोक –
राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषण आणि कोरोनाचीच लाट आहे. श्री. अमित शहा कोरोनातून बाहेर पडले. काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे गुरगावच्या मेदांता इस्पितळात कोरोनाशी झुंजत आहेत. राजधानीत कोरोना वाढत आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी कोरोनाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे.
दिल्लीत थंडी आणि प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याने अनेक आजार भुताटकीसारखे नाचताना दिसत आहेत. ही भुताटकी जीव घेणी आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असे जाणकार सांगतात. बुधवारी मी दिल्लीत होतो. त्या चोवीस तासांत कोरोनाचा स्फोट झालेला मी पाहिला. एका दिवसात साधारण साडेसात हजार कोरोना रुग्ण झाले. त्या चोवीस तासांत 150 म्हणजे सर्वाधिक मृत्यू झाले.
हे सर्व का घडले, तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली. त्या फाजील आत्मविश्वासातून हे संकट वाढले. राजधानीत कोरोना संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते? ज्यांनी आपल्या आप्तांना या दहा दिवसांत गमावले त्यांना सरकार काय जवाब देणार? असा सवाल आता दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला विचारला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाशी झुंजत आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठी दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलात पोहोचलो.
श्री. पटेल हे अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा तणाव मला स्पष्ट जाणवला. कोरोना कोणालाही सोडत नाही व तुम्ही कितीही मोठे असलात तरी कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवत नाही. दिल्लीत पुन्हा ‘लॉक डाऊन’ची तयारी सुरू आहे. बाजार, दुकाने, सार्वजनिक स्थळे व प्रार्थनास्थळे पुन्हा बंद केली जातील. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी करायला हवा.
महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपवाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही.
छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात व कोरोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे. छठपूजा 20 नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे. सार्वजनिक स्थळी छठपूजेला परवानगी देण्यास दिल्ली उच्च न्यायालयानेच बंदी घातली.
दिल्लीतील यमुना घाटावर छठपूजेची परवानगी मिळावी व किमान एक हजार लोकांना तेथे जमा होण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका जनसेवा ट्रस्टने दिल्ली उच्च न्यायालयात केली. दिल्ली हायकोर्टाने ही मागणी केराच्या टोपलीत फेकली. न्यायालयाने याचिका करणाऱयांना दम दिला, ”कोविड-19’ची स्थिती किती गंभीर आहे याचे भान ठेवा.
दिल्ली सरकारने लग्न समारंभास पन्नासपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली ती योग्य आहे आणि तुम्ही छठपूजेसाठी एक हजार लोकांना परवानगी मागताय. हे शक्य नाही!” हे दिल्ली उच्च न्यायालयाचे फटकारे आहेत. भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाही. छठपूजा प्रामुख्याने बिहार किंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले.
मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजप नेते कसे विसरतात? बिहारमधील बहुतेक सर्व जिल्हय़ांत तेथील प्रशासनाने आदेश काढले की, छठपूजा घरच्या घरीच करा. सांस्पृतिक कार्यक्रमांवर बंदी आणलीच, पण नदीच्या घाटांवर पोलिसांनी घेराबंदी करून ठेवली. रस्त्यांवर वाहनांनी यानिमित्त गर्दी करू नये म्हणून कडक निर्बंध लादले. हे सर्व करताना भाजप हिंदुत्वविरोधी ठरत नाही, पण महाराष्ट्रात भाजपची भूमिका वेगळी.
मुंबईतील भाजप नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते ते कोणत्या आधारावर? मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे. मात्र त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही. हे क्रौर्य आणि अमानुषता आहे. सरकारचे काही निर्णय मतभेदाचे विषय ठरू शकतात, पण प्रत्येक निर्णयाला विरोधच केला पाहिजे, प्रसंगी लोकांचे जीव गेले तरी चालतील हे धोरण घातक आहे!
महत्वाच्या बातम्या
- गोंधळात गोंधळ : मुंबई-पुण्यात शाळा बंदच, तर उर्वरित राज्याबाबत संभ्रम कायम
- शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय – उदय सामंत
- मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं – चंद्रकांत पाटील
- टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलाची कामे काढली जातात : मनसे
- संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांचा विजय निश्चित; चंद्रकांत पाटलांना गाढा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
