मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेले नऊ नवनिर्वाचित सदस्य आज दुपारी 1 वाजता शपथ घेतील. ठाकरे यांची 14 मे रोजी विधानसभेवर बिनविरोध निवड झाल्याने सत्ताधारी महाविकासआघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध होणं फार महत्वाचे होते. त्याप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजपकडून 4 , शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2, आणि काँग्रेसकडून 1 अशी वर्णी लागली आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती आमदार झाली आहे. याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती.
दरम्यान विधानभवनावर ठाकरे यांच्याशिवाय आठ सदस्य निवडून आले आहेत. यात शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
