🕒 1 min read
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्वत: बोलून दाखवलं आहे.
दरम्यान, भाजपकडून पंकजा मुंडे, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी विधानपरिषदेच्या जागेसाठी गुडघ्याला बाशिंग बधून बसले आहेत. आता भाजप यावेळी नेमकी कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागले असताना नाथाभाऊ अचानक चर्चेत आले आहे. खडसे यांनी स्वतः आपण विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं बोलून दाखविल्याने आता मोठी रंगत आली आहे.
खडसे म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल सदस्य म्हणून कुणाची नेमणूक करायची याचा निर्णय घेण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल. मागील राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इच्छुक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल’, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
