मुंबई : कोरोना संकटाची मोठी झळ ही अर्थव्यवस्थेला बसली आहे. कारण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत होते. या महसुली तुटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
महसूली तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल याचा अर्थ एकूण येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक संकट उभं राहणार आहे. मी पंतप्रधन मोदी यांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची पुनर्रचना, अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदतीच्या कर्जात रुपांतर, कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं, पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा, असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले.
उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि कुशल मनुष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे.

