🕒 1 min read
मुंबई : मागील वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी चा जन्म झाला व पहिल्यांदाच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- काँग्रेस पक्ष अशा तीन पक्षांची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी झालेले राजकीय नाट्य हे अजूनही चर्चेत असतेच. महाविकास आघाडीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी पसंती केली होती. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ सुरु होऊन ६ महिने पूर्ण होत आले आहे. अशातच कोरोनामुळे विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या साथी मध्ये देखील राजकीय वादविवाद चालू झाले आहेत. यातच आज सचिन सावंत यांनी ट्विट करून थेट राज्यपालांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ते म्हणतात, महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोपी काढून विचार केला तर निश्चितपणे त्यांना आपल्या जबाबदारीची आठवण होईल आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करतील. ही टोपीच घटनात्मक जबाबदारीच्या आड येत आहे.
दरम्यान, काळी टोपी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पोशाखाच भाग आहे. नेमका हाच मुद्दा उचलत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला असावा. सोबत त्यांनी हि टोपी काढून ठेवली तर जबाबदारीची आठवण येईल असेही म्हटले आहे. काही वेळा पूर्वीच शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनावर महामहिम राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्यांनी देखील भेट घेतली होती.दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच जनता दल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जनतेच्या वतीने निवेदन दिले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
