अहमदनगर: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम कौतुकास्पद आहे.
त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. औरंगाबादहून मुंबईकडे जाताना टोपे हे नगरमध्ये थांबले होते. येथेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीतून आरोग्य सुविधा बळकटीकरण करून घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या दिल्या. जिल्ह्यात सध्या सुरू असलेले कंटेटमेंट झोन, तेथील परिस्थिती याची माहितीही त्यांनी घेतली. ते म्हणाले की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी कंटेटमेंट झोन भागात कडकपणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगर पालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार, राज्य वैद्यकीय पथकाच्या सदस्य डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरांबिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
