🕒 1 min read
पुणे : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं मुलांच्या काळजीपोटी पालकांचीही चिंता वाढली आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी राज्यातल्या शाळा-महाविद्यालयांना तातडीनं सुट्टी जाहीर करा, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे पत्र पाठवून पालकांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतल्या एका शाळेनं वार्षिक परीक्षा न घेताच उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.दरम्यान,दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. कोरोना राज्यभर हातपाय पसरत असताना शासनाला काहीच काळजी नाही का असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. एका बाजूला गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे आवाहन सरकार करत आहे तर दुसऱ्या बाजूला शाळांमध्ये होणारी गर्दी सरकारला दिसत नाही का हा मुख्य प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरु असणारा हा खेळ कधी थांबणार असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, येत्या रविवारी एमपीएसएसीकडून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा घेण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांकडून होतं आहे. या परीक्षेसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती ही परीक्षा केंद्र आहेत. पुण्यातीलच परीक्षा केंद्रांवर 40 हजार उमेदवार परीक्षा देतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
परीक्षा देण्यासाठी परिक्षार्थी त्यांच्या पालकांसह पुण्यात येतील. त्यामुळे गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल अशी शंका व्यक्त होत आहे. तसंच परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येईल, यामुळे अजून धोका वाढेल. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
कर्नाटकात बुधवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आज आला आहे. यामध्ये त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती, असे निष्पन्न झाले आहे.केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७वर पोहोचली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
