दांडीयात्रेची नव्वदी आज आहे. ज्या तात्कालिक कारणामुळे म्हणजे मिठावरील करामुळे ही यात्रा निघाली , तो कर काही सरकारने माफ केला नाही , मागे घेतला नाही.या मर्यादित अर्थाने कदाचित ती सफल झाली नाही. तसाच विचार केला तर गांधीजींच्या बहुतेक अनुयायांना ही ‘ यात्रा ‘ यशस्वी होईल का याबद्दल सुरुवातीला तरी शंका होतीच…प्रत्यक्षात या यात्रेने देशात जणू विजेचा संचार झाला….कविवर्य ग.दि.माडगूळकरांनी ‘ उचललेस तू मीठ मूठभर , साम्राज्याचा खचला पाया …’ या शब्दात त्या यात्रेचा जणू परिणामच कथन केला आहे. एवढे मोठे ब्रिटीश साम्राज्य , त्या साम्राज्याच्या बुलंद आणि ऐतिहासिक इमारतीचा पाया खचला तो अगदीच साध्या वाटणाऱ्या मिठासाठी झालेल्या सत्याग्रहाने …!
या सत्याग्रहाचे वृत्तांकन करणाऱ्या वेब मिलर या अमेरिकेच्या पत्रकाराने पाठवलेल्या बातम्यातील काही परिच्छेद पुढे दिले आहेत.हे परिच्छेद वाचल्यावर गांधीजींची बलाढ्य साम्राज्याचा नि:शस्त्र मुकाबला करण्याची शिकवण किती परिणामकारक होती हे लक्षात येते….ही शिकवण माणसाला अगदी निर्भय जीवन जगण्याची प्रेरणा देत होती.. खाली दिलेले परिच्छेद लुई फिशरने लिहिलेल्या गांधी चरित्राच्या मराठी अनुवादातून घेतले आहेत. ( अनुवाद : वि.रा.जोगळेकर )अगदी शेवटच्या ओळी गांधी : सचित्र जीवनदर्शन या प्रमोद कपूर यांच्या पुस्तकातून.( मराठी अनुवाद : सविता दामले )
( वेब मिलरने सुमारे दीड हजार शब्दांचा वृतांत लिहिला . तो तारेने पाठवण्यास सुरुवातीला नकार दिला गेला तेव्हा त्याने हा नकार आपण जगाला सांगू असे बजावले! हा वृतांत जगातील अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला . त्याची साम्राज्य सत्तेला दखल घ्यावी लागली. त्याने धारासनाच्या ज्या सत्याग्रहाबद्दल लिहिले तो महात्माजींच्या अटकेनंतर झाला . )
मिलरने लिहिले ….
मणीलाल गांधींच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी (धारासना येथील )भल्यामोठ्या मिठागराकडे कूच केले…..त्याभोवती तारेचे कुंपण होते.संरक्षणासाठी एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरतच्या चारशे पोलिसांची तुकडी तैनात होती. अत्यंत शांतपणे गांधींची माणसे मिठाच्या ढिगाऱ्यापासून दीडशे यार्डावर येऊन पोचली… एका तुकडीने चरातून कसेबसे चालत जाऊन तारेच्या कुंपणापर्यंत मजल मारली. पोलिसांनी त्यांना मागे फिरण्याची आज्ञा केली.तरीदेखील ते पुढेच निघाले .हुकूम मिळताच शेकडो भारतीय पोलिसांनी , पुढे चाललेल्या स्वयंसेवकांच्या मस्तकावर लोखंडी नाल असलेल्या लाठीने तडाखे द्यायला सुरुवात केली.तडाखा चुकवण्यासाठी एकानेही आपला हात वर उचलला नाही. ठोका मारून खिळा ठोकावा तसे ते खाली कोसळत होते.त्यांच्या मस्तकावर तडाखे बसत होते. मी उभा होतो तिथे त्यांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते……ज्यांना तडाखे बसत होते ते खाली कोसळले किंवा बेशुद्ध पडले . डोकी आणि खांदे लाठीच्या तडाख्याने फुटले – मोडले , ते वेदनेने लोळण घेत होते. ज्यांना अजून तडाखे बसले नव्हते ते , रांग न मोडत शांतपणे आणि निर्धाराने पुढेच चालले होते. तडाखे खाली पडू किंवा मारले जाऊ हे माहित असताना दुसरी तुकडी क्षणभर देखील न डगमगता निर्धाराने पुढे येत होती.त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे किंव घाबरल्याचे भाव मुळीच नव्हते…..
पोलिसांनी देखील पुढे सरसावून , यंत्रवत दुसऱ्या तुकडीला तडाखे देऊन खाली पाडले. स्वयंसेवकांनी झगडा केला नाही किंवा खळखळ केली नाही…पंचेविसशेपैकी उरलेल्या स्वयंसेवकांनी बैठकच मारली.पोलिसांनी त्यांच्या पोटावर आणि अवघड जागी लाथा मारायला सुरुवात केली. पाठोपाठ दुसरी तुकडी पुढे आली आणि त्यांनीही बैठक मारली. पोलिसांनी भडकून त्यांना फरफटत ओढत नेऊन चरात फेकून दिले. मी जेथे उभा होतो तेथे रक्तबंबाळ झालेल्या स्वयंसेवकांचा रेंदा माझ्या या अंगावर उडून मी ओलाचिंब झालो….पोलिसांनी दुसऱ्या एकाला आणून चरात फेकून त्याच्या डोक्यावर लाठ्यांचा वर्षाव केला..बेशुद्ध किंवा रक्तबंबाळ झालेल्या स्वयंसेवकांना स्ट्रेचरवरून पिछाडीस नेण्याचे काम तासन तास चालले होते….
सकाळी अकरा वाजता तपमान ११६ ला पोहचले होते. गांधींच्या माणसांच्या हालचाली आता मंदावली होत्या. मग जखमी झालेले ३२० , कित्येकजण बेशुद्ध पडलेले , कित्येकजण डोक्यावर आणि शरीरावर तडाखे बसलेले , प्राणांतिक वेदनेने तळमळत असलेले मला दिसले…हेच दृश्य पुढे कित्येक दिवस कुठेकुठे चालू होते…गेली अठरा वर्षे मी जवळजवळ बावीस देशात जाऊन बातम्या गोळा करतो आहे , परंतू अंगावर काटा आणणारी अशी दृश्य अन्यत्र कुठेच पाहिली नव्हती. – राधाकृष्ण मुळी (माहिती उपसंचालक लातूर )यांच्या फेसबुक भिंतीवरून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
