टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ओसरता प्रभाव आणि शिवसेनेला मात देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी होणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण करेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्याच्या मनसेच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा आहे. २३ जानेवारी २०२० रोजी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार असून, या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देणार आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याबरोबरच राज ठाकरे मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाची मोट बांधणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याच्या तयार करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठीच झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, “जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आपली विचारधारा सोडली आहे. अशा वेळेस ती जागा भरून काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे,” असे सांगत भाजपशी युती करण्याचा अप्रत्यक्ष प्रस्ताव विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांचा वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
तर, मनसेच्या मराठी कार्डाचा प्रभाव ओसरताना दिसत आहे. २०१४ आणि २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. त्यामुळेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन पुढची खेळी खेळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

