🕒 1 min read
पुणे : जगभरातील तरुणांच्या अभिव्यक्तिचे निर्भय व्यासपीठ अशी स्मिता पाटील आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ख्याती झाली आहे. कारण इथे विषयांना बंधन घातले जात नाही. विषयांचे बंधन कलेला बंदिवान बनविते आणि अभिव्यक्तीचा गळा घोटते. त्यामुळे जगभरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय स्थित्यंतराचे तो प्रतिबिंब बनला आहे. जगातील अन्यायग्रस्त आणि दबलेल्या जनसमुहांचा तो आवाज बनला आहे, असे मत आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख समाजवादी विचारवंत डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेना आयोजित ८ व्या स्मिता पाटील आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी डॉ.वैद्य बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘सूर्योदय’ आणि ‘लाल सलाम’ या जागतिक प्रसिद्धीप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक आणि महोत्सवाचे ज्युरी गगनविहारी बोराटे हे होते.
यावेळी डिरेकटर्स गिल्ड ऑफ अमेरिकेचा अत्यंत प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक पुरस्कार आणि वर्ल्ड फेस्ट ह्युस्टनचा मानाचा ‘रेमी पुरस्कार’ महोत्सवाचे एक संचालक सोहिल वैद्य यांना त्यांच्या ‘डिफिकल्ट पीपल’ या लघुपटाला मिळाल्याबद्दल त्यांचा गगनविहारी बोराटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हा लघुपट जगभरातील ४५ महोत्सवांमध्ये निवडला गेला , ज्यात पाच ऑस्कर क्वालीफाईंग महोत्सव होते.
डॉ. वैद्य म्हणाले की, लघुपट हे अर्थार्जनाचे साधन नाही. त्यामुळे ते निर्माण करणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रकार हे समाजमनाचा कानोसा घेत, सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक बदलांचा ध्यास घेवून ते निर्माण करतात. त्यांच्या सर्जनशीलतेची कदर हा चित्रपट महोत्सव करतो. कोणत्याही अनुदाना शिवाय चालणाऱ्या या महोत्सवासाठी जगभरातील सुमारे ८० देशांमधून सुमारे २५० उत्तमोत्तम लघुपट दाखल होतात ही गोष्टच यावर शिक्कामोर्तब करते.
दोन दिवसांचा हा चित्रपट महोत्सव २०१२ साला पासून प्रतिभावंत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो. या महोत्सवासाठी जगभरातून किमान ८० देशांमधून दाखल झालेल्या सुमारे २५० लघुपटांमधून सुमारे ६० चित्रपट अंतिम फेरीसाठी निवडले जातात. यातून ६ पुरस्कार आणि काही ज्युरी स्पेशल पुरस्कार दिले जातात. या वर्षी जेष्ठ चित्रपट समिक्षक अशोकजी राणे, गगनविहारी बोराटे आणि सोहिल वैद्य यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206577021578432512?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206578801108385793?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
