🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला आहे. तर आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. अर्ध्याहून अधिक जग लॉकडाऊनमध्ये असूनही कोरोनाचा विषाणू अत्यंत वेगाने फोफावत आहे. इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 99 हजार 711 झाली असून या आजारातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या 2 लाख 28 हजार 975 इतकी आहे.केरळमधील 93 आणि 88 वर्ष वय असणारं दांपत्य कोविड 19 आजारातून पूर्णपणे बरं झालं आहे. देशातले कोविड-19 आजार झालेले हे सर्वात वृद्ध नागरिक आहेत.
तर दुसरीकडे भोपाळमधली कोरोनाचा संसर्ग झालेली पहिली महिला आणि तिचे वडीलही या आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. अन्य राज्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
तेलंगणमधले 15 आणि हरियाणामधले 14 नागरिक या आजारातून बरे झाले आहेत. ओडिशामध्ये पाचशे एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर्सना कोविड-19 वरील उपचारांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. बिहार सरकारनं 22 मार्चनंतर राज्यात आलेल्या राज्याबाहेरील सर्व नागरिकांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

