टीम महाराष्ट्र देशा : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमॅरेथॉनला आज पहाटे उत्साहात सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पण याच दरम्यान, मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावत असताना 64 वर्षीय गजानन मालजलकर यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माजलकर हे ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमधून धावत होते अशी माहिती आहे. याशिवाय अन्य सात जणांनाही धावताना हृदयाचा त्रास जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राधा सिंग (38), सहाना आचार्य (42), समीर निरगवडे (43), हर्ष मेहता(54), हिमांशू ठक्कर (47), लोयर्ड (38), सागर पाटील (33) या सात जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, वरळी येथून हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे 17 वे वर्ष असून या स्पर्धेत सुमारे 55,322 स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी साडे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

