🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण 55 हजार 322 धावपटू सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरुवात झाली आहे. तर वरळी डेअरी इथून अर्धमॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिस रक्कम असून या स्पर्धेत मुख्य स्पर्धेतील तीन परदेशी धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर , २५ हजार डॉलर आणि १७ हजार डॉलर रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर भारतीय स्पर्धकांना ५ लाख ,४ लाख ,३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
दरम्यान, टाटा मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी मुंबई महापालिकेसह सर्व प्रशासकीय व पोलीस यंत्रणाही सज्ज असून स्पर्धकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी विविध वाहतूक बदल आणि अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. शिवाय वैद्यकीय स्टेशने, पाणी केंद्र, टेट्रापॅक, बेसकॅम्प, रिस्टोरेशन केंद्र आदी सुविधांची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली आहे.


