🕒 1 min read
चंद्रपूर : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या बैठकीत मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे. मात्र गेली ५४ दिवस अडकून बसलेल्या परराज्यातील नागरिकांना आता घरी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळेच चंद्रपूर येथील 1500 कामगार आणि मजुरांनी आम्हाला घरी जायचय, असे म्हणत ठिय्या आंदोलन केले आहे.
चंद्रपूरच्या निर्माणाधिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी उत्तर प्रदेश, बिहार, बंगालचे मजूर कामासाठी आले आहेत. शापोरजी-पालनजी कंपनीकडे या बांधकामाचे कंत्राट आहेत. लॉकडाऊन दरम्यान हे काम बंद आहे. मात्र कंपनीने या मजुरांना मजुरी तसंच रेशन काहीही दिलेलं नाही. यामुळं संतापलेल्या कामगारांनी काही काळासाठी महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. ‘आम्हाला गावाला जाऊ द्या’ असं म्हणत मजूर रस्त्यावर उतरले.
चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या बल्लारपूर येथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी बिहार, झारखंडच्या दिशेने रवाना होण्याच्या 12 तासांच्या आतच त्याचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. या रेल्वेस्थानकापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामस्थळी कामावर असलेले मजूर अचानक महामार्गावर येऊन आंदोलन करू लागले. यावेळी पोलीस आणि डॉक्टरांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
चंद्रपूर -बल्लारपूर वळण मार्गावर ही नव्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. याचे कंत्राट बांधकाम कंपनी शापूरजी -पालनजी यांच्याकडे आहे. इथले बांधकाम दीड महिन्यांपासून बंद आहे. मात्र इथला मजूर वर्ग काम नसल्याने व मजुरी मिळत नसल्याने संतापला आहे. सोबतच कंपनीने रेशन देण्याचे केवळ आश्वासन दिले. यामुळे मजुरांचा संतापात भर पडली. आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर आले व त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.


