मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलीस दलाच्या काही पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील 1000 पोलिसांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. त्यापैकी 851 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 148 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.
या माहितीनुसार लॉकडाउनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 218 घटना घडल्या असून, अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 770 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. आज कोरोनाच्या लढ्यात अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरक्षित राहणे महत्वाचे आहे. यासाठीच गृह खात्याने हेल्पलाइन ते ताप तपासणी केंद्रापर्यंत काही उपाययोजना केल्या आहेत.
याबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की, राज्यातील पोलिस दल कोरोनाविरोधाच्या लढाईत 24 तास कार्यरत आहेत. कार्यक्षमतेच्या दुप्पट पोलिसांना काम करावं लागत आहे. त्यामुळे साहाजिकच त्यांच्या आरोग्यावर तसेच कुटुंबियाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. राज्यातील जवळपास 900 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सर्वांच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाने पोलिसांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत.
हेल्पलाईन : कोरोनाबाधित पोलिसांना कोविड रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत यासाठी एक कोविड हेल्पलाइन संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनद्वारे तज्ज्ञांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जाते. हे कक्ष मुंबई पोलीस आयुक्तालयमार्फत मुंबई पोलिसांसाठीदेखील तयार केले आहे.
सुरक्षेसाठी 4 कोटींची साधनसामग्री : सतत कार्यरत असणाऱ्या पोलिसांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काही साधन सामग्री दिली गेली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आतापर्यंत जवळपास 7.5 लाख विविध प्रकारचे मास्क 15 हजार लिटर सँनिटायझर, 22 हजार फेस शिल्ड, 44 हॅन्ड ग्लोव्हज, ड्रोन कॅमेरा अशा आवश्यक असलेल्या जवळपास चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. खरेदीचे अधिकार, 137 कोटींचा निधी : पोलिसांच्या आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, याकरिता कोविड 19 प्रतिबंधात्मक आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीकरीता पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. असे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तालयातही देण्यात आले.
तसेच प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप, कोविड अग्रिम, शासकीय अनुदान, सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडे लक्ष, वारसांना नुकसान भरपाई., यासारख्या उपाययोजना पोलिसांसाठी गृहखात्याकडून मिळणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
