🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राजधानी दिल्लीत प्रदर्शित करण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे. जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रदर्शित केल्याची माहिती दिली आहे.
दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’पुस्तक प्रदर्शित करण्यात आले, अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे. मात्र, भाजप पक्षाशी संबंधित कोणत्याही ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिलेली नाही.
https://twitter.com/JaiBhagwanGoyal/status/1215952376873402368?s=20
युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील भाजपवर खरपूस टीका केली आहे.बच्चू कडू म्हणाले कि, सात जन्म, सात पिढ्या झिजवून काढले तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक पुस्तक काढणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशी तुलना करण अत्यंत चुकीचे आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याचे हे केवळ पाईक आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
एकीकडे शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका म्हणणारे छत्रपती आणि दुसरीकडे अख्खा शेतकरी लुटून बरबाद करणारे मोदी, हे शिवाजी महाराज कसे होऊ शकतात?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
या पुस्तकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटणारं नाही.दरम्यान, भाजपच्या या पुस्तक प्रकाशनामुळे विरोधीपक्ष आक्रमक झाले असून या पुस्तकाद्वारे नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
