विरेश आंधळकर : १२ वर्षापासून नीरा देवघर धरणाचे बारामतीला नेण्यात येणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. माढ्याचे नवनियुक्त खा. रणजितसिंह निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चालवलेल्या प्रयत्नांना राज्य सरकारच्या निर्णयामुळे यश आले आहे, ‘उल्टा चोर कोतवाल को डाटे’ प्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पाण्याच राजकारण केल जात असल्याची ओरड होत आहे. मात्र कायम दुष्काळी भाग असणाऱ्या फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूरचे हक्काचे पाणी बारामतीला पळवण्याचे पाप कोणी केले? या प्रश्नांचे उत्तर अवघा महाराष्ट्र देऊ शकतो.
दुष्काळी भागाची तहान भागवण्यासाठी २००२ मध्ये नीरा-देवघर धरणाचे काम करण्यात आले, पुणे जिल्हातील भाटघर, नीरा-देवधर आणि गुंजवणी या तीन धरणातून पाणी वीर धरणात येवून तिथून ते दोन कालव्यातून इतरत्र पोहचवले जाणार होते. मात्र त्यांचे काम आजवर पूर्ण झालेले नाही. जोपर्यंत कालवे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे पाणी नीरा कालव्यातून सिंचन व पिण्यासाठी देण्याचे धोरण ठरले होते. नीरा उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण अवलंबण्यात आले.
१९५४ साली पाणीवाटपाच्या करारानुसार उजव्या कालव्यातून एकूण पाण्यापैकी ५७ टक्के पाणी साताऱ्यातील फलटण आणि सोलापूर जिल्हातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्याला पाणी मिळणार होते. तर डाव्या कालव्यातून ४३ टक्के पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्याला मिळणार होते, परंतु जाणता राजा म्हणवले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धूर्तखेळी करत ४ एप्रिल २००७ रोजी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामुळे आता डाव्या कालव्यातून ६० टक्के पाणी बारामती व इंदापूरला तर उरलेले ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही पवारांनी आपली राजकीय ताकद वापरत केलेला करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतच होता, मात्र तरीही आजवर हे पाणी असेच बारामती, इंदापूरला पळवण्यात येत होते. फलटणचे रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांनी देखील जनतेला वाऱ्यावर सोडत एक शब्द काढला नाही. एका बाजूला दुष्काळी भागाचे हक्काचे पाणी पळवून पवार मात्र माढा लोकसभा मतदारसंघात दरवेळी संगोल्याची तहान भागवण्याची आश्वासने देत राहिले. २००९ साली मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन केलेली गर्जना देखील ‘जुमला’ असल्याचे आता उघड झाले आहे.
भाजपने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवत पाणी बंद केल्याचे ढोल वाजवले तरी त्याच्या मागे असणारी पवारांना कात्रजचा घाट दाखवण्याची खेळी उघड आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले मोहिते पाटील पिता – पुत्रांनी देखील आपला बदला काहीअंशी पूर्ण केला आहे. तर आजवर शरद पवार यांना आदराने जानता राजा मानणारी जनता आपल्याच राजाने दहा वर्ष दुष्काळाच्या खाईत लोटल्याची भावना व्यक्त करत आहे.
शेवटी बारामतीकरांनी भाजप पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यापेक्षा आपली चूक मान्य केल्यास मोठ्या मनाची जनता त्यांना विधानसभेला थोडीफार माफ करू शकते. अन्यथा लोकसभेची पुनरावृत्ती होऊन सोलापुर आणि सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित राहील.


