🕒 1 min read
गंगापूर : कोरोना आला आणि प्रत्येकाच्या मनात कोलाहल माजले. पॉझिटिव्ह येण्याच्या भितीने माणसे माणसांपासून दुरावली. अनेक ठिकाणी मुलांनी आईबापावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. कोरोनाच्या या काळात अनेक ठिकाणी माणुसकी संपल्या चित्र आहे. रुग्णाला हात लावण्यासही लोक घाबरत आहेत अशा परिस्थितीत गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील तरुणांनी स्वत:च्या कारचे मोफत रुग्णवाहिकेत रूपांतर करुन कोरोनाच्या भितीने आईवडिलांनाच नाकारणाऱ्या तरुण पिढीपुढे सेवेचा एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
कोरोना महामारी सेवाकाळात लोकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, औषधी यासोबतच रुग्णवाहिका ही अत्यावश्यक झाल्या आहेत. ग्रामीण भागात तर रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. लासुर स्टेशन येथील माजी उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी आपले वडील कै अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठानच्यावतीने रुग्णांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली परंतु ग्रामीण भागातील वाढती गरज लक्षात घेता ती अपुरी पडू लागल्याने या अवलियाने आपल्या वैयक्तिक कारचेच रूपांतर रुग्णवाहिकेत करून काम सुरू केले.
ते स्वतः व त्यांचे बंधू दिनेश व योगेश रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम करतात. लासूर परिसरातील गावात व्यवहारे बंधू रुग्णांना मोफत अँम्ब्युलन्स उपलब्ध करून देत आहेत. रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे, निराधार वृद्ध रुग्णांची सर्व व्यवस्था करणे त्यांना पुन्हा घरी घेउन येणे एखादा रुग्ण मृत झाल्यास पार्थिव गावी घेऊन जाणे असे जमेल ते सर्व करत आहेत. त्यांचे आजोबा दादाभाऊ व्यवहारे यांनी १०७२ च्या दुष्काळात ग्रामस्थांना अन्नधान्य वाटप केली होते. तर वडील कै. अंबादास व्यवहारे यांनी चिकनगुनिया आजारांच्या साथीत तसेच सेवाकार्य केले होते तोच वसा त्यांचे तिन्ही चिरंजीव पुढे चालवत असून त्यांच्या या कार्याबद्दल गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी देखील कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा धायगुडे यांचे निधन
- ‘अहो नड्डा, मोदींनी देशाला बनवलंय मृत्युंचा अड्डा’, सचिन सावंताचे शायरीतून टोले
- कायदा फुलप्रूफ असता तर आज ही वेळ आली नसती ; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
- ‘लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा’
- शाब्बास औरंगाबादकर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात आपण यशस्वी- आयुक्त पांडेय


