टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील गरीब आणि गरजू रुग्ण केवळ पैशाअभावी वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नये म्हणून फडणवीस सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी योजना लागू केली. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अनेक रुग्णांना मदत करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पाच सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री सहायता निधीत एकही पैसे नसल्यामुळे राज्यातील ५००० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी येणारी मदत रखडली असल्याची माहिती समोर येतेय.
या सहायता निधीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली असल्याने राज्यातील गरीब कुटुंबातील गरजू रुग्णांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर सहायता निधी कक्षाकडे माहिती विचारली असता निधीच उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रशासनाकडून निधी नसल्याचे उत्तर येत असेल तर ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे दीपिका चव्हाण यांनी सांगितले.


