मुंबई: कल्याणमधील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहनचालक सिग्नल हिरवा होण्याच्या प्रतिक्षेत होते. त्याचवेळी एक बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर येऊन उभा राहिला व त्याने कार चालकाशी वाद घालायला सुरुवात केली. हे दृश्य एका नागरिकाने पाहिले आणि काही अनुचित प्रकार घडू शकतो या संशयातून त्याने ही घटना मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरुवात केली. काही वेळाने सिग्नल सुटला असताना कार चालकाने कार समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच दरम्यान वाहतूक पोलिसांनी व्हिडियोच्या आधारे कार शोधून काढत चालकावर गुन्हा दाखल केला.
प्रवीण चौधरी असे या कारचालकाच नाव आहे तर फरफटत नेलेल्या व्यक्तीचे नाव त्रिवेश असे आहे. प्रवीणचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा त्या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय आल्याने त्रिवेशने प्रवीणला आधारवाडी चौकात अडवून वाद घातला. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र या प्रकरणी शहर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला असून आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

