टीम महाराष्ट्र देशा : कोकणातील पर्यटनाकडे राज्यासह देशातील पर्यटकांचा ओढा असतो. कोकणात नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य आहे. ते पाहण्यासाठी पर्यटक कोकणाकडे आकर्षित होतात. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोकणातील पर्यटन व पूरक उद्योगाला चालना देणार असल्याचं म्हटलं आहे.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करणार या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांनी ‘पर्यटनावर आधारित असलेल्या अनेक बाबींना चालना द्यावी लागणार आहे. रायगड किल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा हुंकार दिलेले महाड येथील चवदार तळे, डॉ. आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे, मंडणगड तालुक्यात आहे, या ठिकाणांचा विकास करायचा आहे.
तसेच, महर्षी कर्वे, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन भारतरत्न कोकणात जन्माला आले, त्यांचे एकत्रित राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहाघर येथे पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. असं तटकरे म्हणाले.


