नांदेड : 18 विद्यार्थ्यांनी टँकरमध्ये बसून जालना ते नांदेड असा जीवघेणा प्रवास केला. नांदेडमध्ये पोलिसांना संशय आल्याने त्यांनी 18 विद्यार्थ्यांसह चालकालाही ताब्यात घेतलं. यामध्ये 16 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. सगळे विद्यार्थी तेलंगणा राज्यातील रहिवासी असून जालन्यात कृषीचे शिक्षण घेतात.
दरम्यान, नांदेडपर्यंत टँकरने आल्यावर पुढे पायी जाण्याचा त्यांचा विचार होता. हे विद्यार्थी पूर्णा रोडवर पोहोचताच भाग्यनगर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. सर्व विद्यार्थ्यांची रवानगी शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे.
दरम्यान,राज्यात कोरोना राज्यात चांगलाच हातपाय पसरू लागला आहे मात्र लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला काल नागपूरहून खासगी रुग्णवाहिकेतून वर्ध्याला आलेल्या महिलेसह तिचे नातेवाईक, रुग्णवाहिका मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता नागपूरमधून वर्ध्याला आल्याने त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या अन्वये या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईतले सर्वाधिक ६ रुग्ण आहेत. पुण्यातले पाच, नवी मुंबई , नंदुरबार आणि धुळे इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण मृतांची संख्या २८३ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ८४०जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत.


