टीम महाराष्ट्र देशा: बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यापासून सुरु होती, खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला होता, मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातून आलेल्या आयारामांमुळे भाजप – शिवसेनेतील आमदार डावलेले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते नाराज झाले आहेत. यामध्येच केंद्रात शिवसेनेला एकच मंत्रीपद देणे, राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेला कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
गेली साडेचार वर्षे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यामुळे युतीतील अनेक नेते आपल्याला शेवटच्या टप्यात मंत्रीपद मिळण्याची आशा लावून बसले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादीतील अनेकांनी भाजप – शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप – सेनेतील नेते नाराज आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर स्वपक्षातील नेत्यांची नाराजी दोन्ही सत्ताधारी पक्षांना परवडणारी नाही, यावर उपाय म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराच लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील, मोहिते पाटील पिता – पुत्र, तसेच शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना वेटिंगवर रहावे लागणार आहे.


