टीम महाराष्ट्र देशा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प धारकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले आहे, ते पुण्यात बोलत होते.
आषाढी एकादशी निमित्त जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू ते पंढरपुर ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात मंगळवारी सकाळी प्रस्थान झाले. लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात या वारीत सहभागी झाले आहेत. दरम्यान आज ( २६ जून ) बुधवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले आहे. लाखो वारकऱ्यांनी पुणे शहर दुमदुमले आहे, दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि शेकडो धारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संभाजी शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात एकत्र आले होते, त्यावेळी त्यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू व्रत घेवून जगले. आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जगणारा समाज निर्माण करायचा आहे. असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प धारकऱ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.


