बीड : कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. पण ग्रामीण भागात याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. गेवराईत देखील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून येथील नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. नियमांचा भंग करत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार अचानक रस्त्यावर उतरून कारवाईला लागले. या कारवाईत ४ दुकाने सील करण्यात आली आहेत.
कोविडच्या पहिल्या लाटेचा अतिशय चांगल्या पध्दतीने सामना करणाऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र रोज जिल्ह्यात एक हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी व कोरोना आटोक्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी, सीईओ स्वत: रस्त्यावर उतरत आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सिरसदेवी, पाडळसिंगी, मिरकाळा, गढी, अर्धमसला या ठिकाणी भेट देऊन अचानकपणे पाहणी केली.
रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत २७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच यापुढे नियमांचे पालन करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
गेवराई शहरातही त्यांनी मुख्य बाजारपेठेतील दुकानांची पाहणी केली. काही व्यावसायिक लॉकडाऊन नियमांना बगल देत दुकाने उघडी ठेवून होती त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. चार दुकाने सील करण्यात आली. यासह गेवराई शहरात लॉकडाऊनदरम्यान विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. प्रशासन व आरोग्य विभागाचे कर्मचारी जीव तोडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही कोविड नियमावलीचे पालन करत घरीच थांबावे, असे आवाहन सीईओ कुंभार यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू
- रात्रीस खेळ चाले! परतूरमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा
- अखेर आन्वा प्रशासनाला आली जाग; पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- ‘महा विकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे’


