टीम महाराष्ट्र देशा- हिंदुत्व,संघ आणि भाजपवर टीका करण्यात सर्वात आघाडीवर असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच जड जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेच्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघात आव्हाड यांचा पराभव करण्याच्या हालचाली संघाकडून सुरू झाल्या असून त्यासाठी जवळपास एक हजार स्वयंसेवक या भागात सक्रीय झाल्याचे वृत्त आहे.
हा मतदारसंघ शिवसेनेकडे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कळव्यातील ब्राह्मण सभेच्या सभागृहात त्यासाठी नुकतीच एक बैठकही झाली असून त्यासाठी भाजपचे प्रदेश संघटक आणि संघाचे माजी पदाधिकारी विजय पुराणिक उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीत कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंग यासारख्या विरोधकांचा ज्या पद्धतीने पराभव केला त्या धर्तीवर आव्हाड यांचाही पराभव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
यंदा सेना-भाजप आता एकत्र निवडणूक लढविणार असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर दुसऱ्या बाजूला या मतदार संघात मुस्लीम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक असल्याने वंचित बहुजन आघाडीने देखील या मतदार संघावर लक्ष्य केंद्रित केले आहे. या मतदार संघातील आव्हाडांच्या मतांमध्ये फूट पडण्यासाठी वंचितची मोठी मदत होईल असा विश्वास युतीच्या नेत्यांना वाटत आहे.
सेना- भाजपने देखील कळव्यातील ब्राह्मण समाजाची आणि हिंदूंची मते युतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.जर सेना भाजप एकदिलाने ही निवडणूक लढविण्यात यशस्वी ठरले तर मागील विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा यावेळी चित्र वेगळे असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

