टीम महाराष्ट्र देशा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असतानाचं जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. परहर यांच्या या मागणीवरून त्यांचा रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे दिसून येते. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार गेल्या कित्तेक महिन्यांपासून कर्जत – जामखेडमध्ये विविध कामे करत आहेत. मतदारांच्या समस्या सोडवण्याचे काम ते करत आहेत, त्यांनी मतदार संघात युवकांची मोठी फळीही तयार केली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणीही काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती़ त्यावेळी ‘तुझी मागणी मान्य झाली’ असे उत्तरही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले होते़. त्यामुळे रोहित पवारच या मतदारसंघातील उमेदवार असतील असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामही सुरु केली आहेत.
याचदरम्यान, जिल्हा परिषदेत परहर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन वर्षांपासून रोहित पवार मतदारसंघात विविध कामे करीत आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल मंजुषा गुंड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम केले आहे त्यामुळे त्या सहज निवडून येतील. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. कॉंग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नसून, पंचायत समितीतही त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाहीत त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे त्यामुळे गुंड यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे समोर आले आहे.

