आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटात कम बॅक करत आहे. तिचा ‘मातृ’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने हजेरी लावली ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर.
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातृ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती.
यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली आणि कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गा्ण्यांवर नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशिल विषयावर प्रकाश टाकणारा हा भाग येत्या मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.



सोमवारच्या भागात ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ची टीम
चला हवा येऊद्या च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका चूकभूल द्यावी घ्यावी मालिकेची टीम हजर राहणार आहे. ज्यात दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव,सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश होता. या अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी केलेली धम्माल येत्या सोमवारी रात्री ९.३० वा. बघता येईल


