🕒 1 min read
पुणे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे लगीनसराईच्या काळात सर्व लग्नसमारंभ खोळंबळी आहेत. मात्र पुण्यात एक आगळवेगळं लग्न पार पडलं आहे.
आयटी इंजिनिअर असलेल्या आदित्य बिश्त आणि डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाह यांचा विवाह पुण्यातील अॅमोनोरा क्लबमध्ये पार पडला. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे पुणे पोलिसांनी या मुलीचं कन्यादान केलं.
मुलाचे वडील सैन्यात कर्नल असून त्यांचं पोस्टिंग सध्या देहरादूनला आहे. तर मुलीचे वडीलही सैन्यात डॉक्टर असून ते नागपूरमध्ये कार्यरत आहेत. वर आणि वधू या दोन्ही बाजुच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही.
दरम्यान, हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे , पोलिस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी या लग्नाला हजर होते. पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केलं.


