मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार असल्याचे नुकतेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही वंचित मात्र आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. काल मुंबईत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस पक्षालाच ४० जागा देण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. आपली आघाडी आणि एमआयएमनं राज्यातल्या सर्व २८८ जागा लढवण्याची तयारी सुरू केली असून उमेदवार ठरवण्याचं काम सुरू असल्याचंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेस पक्षानं गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या १४४ जागा लढवलेल्या नाहीत, त्यामुळे या सर्व मतदारसंघात त्यांचं पक्ष संघटन अतिशय कमकुवत आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे, त्यामुळे पक्षाची ताकद बघता आघाडी करताना या पक्षाला ४० जागा देण्यात येईल, असं काँग्रेस पक्षाला कळवण्यात आलं आहे, आता निर्णय काँग्रेसनं घ्यावा, असं आंबेडकर म्हणाले.

