पुणे : कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.
याच मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेत किर्दत यांनी राष्ट्रवादीवर शेलक्या शब्दात टीका केली. भाजपच्या हिदुत्वाच्या राजकारणाला विरोधाचा पुरोगामी चेहरा म्हणून राष्ट्रवादी स्वतःला म्हणवून घेते. जितेंद्र आव्हाड यांचे सारखे त्यांचे नेते सत्तत तीच टेप वाजवत असतात. परंतु सततच्या बदलत्या भूमिका हीच राष्ट्रवादीची विचारधारा बनत चालली असल्याचं किर्दत यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी शरद पोंक्षे यांच्या सभा उधळून लावणाऱ्या राष्ट्रवादीनेच नथूरामप्रेमी पोंक्षे यांना व्यासपीठावर बोलवून भूमिका बदलल्याचे संकेत दिले आहेत. त्यात कालच देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही पूर्वीच राष्टवादी सोबत सरकार स्थापन करणार होतो’ असा गौप्यस्फोट केला आहे. त्याच राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजप सोबत पहाटे पहाटे शपथविधी उरकला होता. अशी संधिसाधू भूमिका घेणाऱ्या तरी सतत पुरोगामी असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शरद पोंक्षे यांना बोलण्याची संधी दिल्यावर आता पक्ष नेत्यांनी सारवासारव सुरु केली आहे असं म्हणत किर्दत यांनी टीका केली.
किर्दत म्हणाले,महात्मा गांधींनी टोचलेल्या लसीमुळे आपण अहिंसक होताहोता नपुंसक कधी झालो हे आपल्याला कळलं सुद्धा नाही, तसेच वीर सावरकर यांचं काम महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा सरस आहे, अशी अनेक बेताल, धक्कादायक, बहुजनांचा अवमान करणारी वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी यापूर्वी केली आहेत. पूर्वी शिवसेनेच्या नाट्यसेनेचा हा प्रमुख होता व त्याविरुद्ध शरद पवारांची थट्टा केल्यामुळे राष्ट्रवादीने विक्रोळीत केस दाखल केल्या होत्या.
ही पोंक्षे यांची पार्श्वभूमी असताना, राष्ट्रवादीच्या नव्या भूमिकेमुळे अनेक बहुजन पुरोगामी पाठीराख्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीचा इतिहास बघता त्यांना विचारधाराच नसल्याने गेल्या अनेक वर्षात सोयीच्या भूमिका घेतल्या जात आहेत असे दिसते असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका फेसबुक पोस्ट मधून स्पष्ट केली आहे. सनातनी शरद पोंक्षेचा NCP सोबत कसलाही संबंध नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सरचिटणीस या नात्याने तो व त्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी लक्ष्मण माने इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे नाट्य परिषदेला व इतर घटकांना कोरोना संकट काळी मदत केली. त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी पोंक्षे परिषदेचा सरचिटणीस नात्याने व्यासपीठावर उपस्थित होता अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक उद्या पुण्यात आंदोलन
लवांडे पुढे म्हणाले,त्या नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळात सर्व विचारधारेचे सदस्य आहेत. त्यांच्या व्यक्तिगत विचारांचा कसलाही पक्षाशी संबंध नाही. पोंक्षे बरोबर पक्षाचे व्यक्तिगत मतभेद कायम आहेत. पक्षाशी त्याचा कुणीही संबंध जोडू नये. नथुराम गोडसे समर्थकांना विरोध कायम राहील. त्या कार्यक्रमाचा सोशल मिडियाद्वारे अपप्रचार गैरसमज करू नये असं म्हटलं आहे.

