🕒 1 min read
पारनेर : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.
अशातच, पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
निलेश लंके यांनी शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरमध्ये एका कुटुंबातील कोरोनाबाधित आई-वडील उपचार घेत आहेत. मात्र, कोरोना बाधित असल्याचं समजल्यानंतर आपल्या लेकरांना कोण सांभाळणार असा सवाल त्यांच्यासमोर निर्माण झालेला. या माऊलीने सख्ख्या भावाकडे मदत मागितली.
मात्र, भावाने त्या लेकरांची जबाबदारी घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे आपल्या लेकरांचा सांभाळ कोण करणार अशी चिंता सतावणाऱ्या माऊलीच्या मदतीला निलेश लंके धावून आले. त्या लेकरांची मामा म्हणून स्वतः जबाबदारी स्वीकारली. यामुळे आता आई-वडील निर्धास्तपणे कोरोनाशी सामना करत आहेत. याबाबत निलेश लंकेनी एक भावनिक पोस्ट केली आहे.
निलेश लंके यांची फेसबुक पोस्ट –
मी आहे ना…त्या लेकरांची जबाबदारी घेतो.
कोरोना आजाराने अनेक ठिकाणी गावागावात कुटुंब उद्ध्वस्त झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी अनेक उदाहरणे आता गावागावात पुढे येऊ लागली आहे. असेच एक उदाहरण राहुरी तालुक्यातील एका गावातील असून एका कुटुंबातील आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कुटुंबातील लहान भाऊ बहीणीला कुठे ठेवायचे असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला.
हे कुटुंब माझ्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. परंतु उपचार घेत असताना आपल्या कोरोनाबाधित आईने राहुरी येथील भावाला फोनवरून मी व तुझा दाजी कोरोना बाधित आढळून आले असून तुझ्या भाचा व भाचीला आम्ही बरे होईपर्यंत तुझ्याकडे ठेव, अशी विनंती केली. परंतु महिलेच्या भावाने नकार देत आम्ही त्यांना ठेवू शकत नाही त्यामुळे त्यांची व्यवस्था तु दुसरीकडे कर, असे ठणकावून सांगितले. या कुटुंबातील प्रमुखांसह या दोन भावा-बहिणीने पुढे मोठा पेच निर्माण झाल्यानंतर ही गोष्ट मला समजली.
मी या कुटुंबाला आधार देत तुम्ही या ठिकाणी निश्चिंतपणे उपचार घ्या, तुमच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी, असे म्हणून सेंटरमध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता असतो त्या ठिकाणी दोन स्वतंत्र बेड लावून दोन्ही भावा-बहिणींची गेल्या आठ दिवसांपासून ते सेवा करत आहे.माझ्या कुटुंबातील सदस्य या नात्याने काळजी घेत आहेत. मी यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतो.त्यामुळे अंगावर असणाऱ्या कपड्यानिशी या दोघा भावाबहिणींना सुद्धा त्यांच्या बरोबर यावे लागले. त्यामुळे या दोघा भावा- बहिणींना नवीन कपडे बुधवारी घेऊन दिले आहे.
कोरोनाला हरवायचे माणुसकीला नाही
गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोनामुळे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना ऐकू येत आहेत. अनेक मुले व कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आई-वडिलांसह सदस्यांना पाहत नाही तर दुसरीकडे उपचारासाठी दाखल झालेल्या अनेकदा रुग्णांकडे संपूर्ण कुटुंब पाठ फिरवत आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना आजाराला हरवायचे आहे माणुसकीला नाही.
महत्वाच्या बातम्या
- सीमेवर लढा देणाऱ्या सैन्यदल अधिकाऱ्याची कोरोनाविरोधी लढ्यात मदत
- आनंदाची बातमी : कोरोना हारतोय, ‘या’ जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर !
- ‘तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वंयपूर्ण झालंच पाहिजे, अशी ठाकरे-पवारांची इच्छा’
- तुम्हाला जमत नसेल तर ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन IIT आणि IIM कडे द्या, कोर्टाने केंद्राला झापले
- कोरोना चाचणी करण्यास सांगितल्याने तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

