टीम महाराष्ट्र देशा: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पवार कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याची घोषणा करत बारामतीमध्ये जंग पछाडलेले पहायला मिळाले, मात्र बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुळे यांच्या पारड्यात आपले माप टाकले. आता चंद्रकांत दादांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव करण्याचं बोलून दाखवल आहे.
अजित दादांचा पराभव करण्याचे पाटील यांचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांना चांगलेच झोंबले आहे. अजित दादाचं काय करायचं ते बारामतीमधील जनता ठरवेल,त्याची उठाठेव चंद्रकांतदादांनी करू नये. आणि याच्यापुढे असेच करायचे असले तर आपणच बारामतीमधून निवडणूक लढवा, एकदा होऊनच जाऊ द्या दुध का दुध – पाणी का पाणी, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते जेष्ठ नेते अंकुश काकडे यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
काकडे यांनी पत्रक काढत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. केंद्रात नवीन सरकार आले, राज्यात लवकरच निवडणुका आहेत, पण भाजप नेत्यांना देशात गांधी घराणे तर महाराष्ट्रात पवार घराण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. उठसूट कुठला हि विषय असला तरी फक्त पवारांवर मग कधी सुप्रिया सुळे तर आता अजित दादांवर तोफ डागणे, याशिवाय त्यांच्या पुढे कुठलेच प्रश्न शिल्लक राहिलेले दिसत नाहीत. असा टोला पत्रकात लगावण्यात आला आहे.
राज्यात शेतकरी, दुष्काळ, विद्यार्थी आणि आरक्षणाचे प्रश्न आ वासून उभे असताना यांना फक्त बारामतीचीच काळजी आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी दिलेली चपराक चंद्रकांत पाटील यांना चांगलीच झोंबल्याच दिसते, त्यामुळेच पाटील यांनी आता अजित पवारांच्या पराभवाची सुपारी घेतल्याचं दिसत आहे, अशी टीका अंकुश काकडे यांनी केली आहे.


