टीम महाराष्ट्र देशा : रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असे वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवाघरच्या पाण्यावरुन सुरु झालेला संघर्ष आता दोन राजघराण्यांपर्यंत येऊन पोचला आहे. नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.
स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं. त्यानंतर रामराजे निंबाळकरांनही उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी बैठक घेतली होती. परंतु उदयनराजे भोसले बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर आले. यावरून शरद पवारांना निंबाळकर आणि भोसले यांच्यातील अंतर्गत वाद सोडवण्यात अपयश आलेलं दिसत आहे.
बैठकीतून बाहेर आल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. कुणाचंही ऐकून घ्यायला मी लेचापेचा नाही. असे उदयनराजे यांनी म्हंटले. तसेच मी उदयनराजे आहे महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागतं. असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर ‘मी आहे चक्रम लोकांवर अन्याय झाला की मी होतो चक्रम. पिसाळलेल्या कुत्र्यासोबत राहिलं तर मला रेबीज होईल’ असा टोलाही त्यांनी रामराजे निंबाळकरांना लगावला. तसेच शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत, पण मी सहन करणार नाही, असेही त्यांनी म्हंटले.


