सोलापूर : संगणक हॅक होऊ शकतो मग ईव्हीएम का नाही, म्हणून लोकसभेच्या फेरनिवडणुका घ्याव्यात. आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात केली.
खा. उदयनराजे भोसले हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्री विठ्ठल, म्हसोबा, तुळजाई, सिध्देश्वर, दर्गा आदी विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. यानंतर बोलताना ते म्हणाले, ईव्हीएम म्हणजे इंग्रजी सिनेमासारखे असून बटन दाबले की गोळी कुठेही लागते. कॉम्पुटर हॅक होतो मग ईव्हीएम मशीन का नाही? २०१४च्या निवडणुकीचा डेटा आज निवडणूक आयोगाकडे नाही. व्हीव्हीपॅट करता येते मग मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया घेण्यास काय हरकत आहे असा थेट सवाल भोसले यांनी विचारला आहे.
लोकसभेची फेरनिवडणूक झाली पाहिजे. प्रत्येकाने चिंतन केले पाहिजे. आयटीमधील तज्ज्ञांना चर्चेस बोलवा आणि मलाही बोलवा. माझ्या इतकाच सर्वसामान्यांनाही अधिकार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्याव्यात. तसे झाले तर आज सत्तेवर आलेले परत दिसणार नाहीत असा विश्वास देखील भोसले यांनी व्यक्त केला.


