टीम महाराष्ट्र देशा : पुणे शहर आणि परिसरातही काही ठिकाणी गेले दोन दिवस हलक्या पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हवामानाची स्थिती विचित्र झाली आहे. आकाशाच्या ढगाळ स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी घटली. मात्र, ही स्थिती निवळणार असून, तापमानात घट सुरू झाली आहे.
पुढील दोन ते तीन दिवस शहरात हलका पाऊस, धुके आणि थंडीची स्थिती राहील. मात्र, कडाक्याच्या थंडीसाठी नव्या वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची सध्याची स्थिती आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ामध्ये किमान तापमान कमी होऊन थंडी जाणवत होती. शहरातील किमान तापमनान ११ ते १४ अंशांच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी अधिक असले, तरी रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. नाताळच्या दिवशी २५ डिसेंबरला थहरात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. २७ डिसेंबरला मात्र त्यात ४.६ अंशांनी घट होऊन १६.८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. त्यामुळे पुन्हा काहीशी थंडी जाणवू लागली आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात बदल होऊन पुन्हा थंडी जाणवणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यानंतर २९ आणि ३० डिसेंबरला आकाश अंशत: ढगाळ राहून अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशीही शहरात पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे. ३१ डिसेंबरपासून मात्र आकाशाची स्थिती निरभ्र राहणार आहे. परिणामी तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढत जाणार आहे. या दोन ते तीन दिवसांमध्ये किमान तापमान १४ ते १५ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

