टीम महाराष्ट्र देशा :-गुजरातमधील कच्छ भागामध्ये पाकिस्तानी कमांडोंनी घुसखोरी केल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले दहशतवादी येथे घुसले असल्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आली असून यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सोबतच बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनाही हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे दहशतवादी कच्छमध्ये घुसले आहेत. हे दहशतवादी पाण्याच्या खालून हे हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आला आहे. हे दहशतवादी समुद्रातील जहाजांना लक्ष्य करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान गुप्तचार विभागाच्या माहितीनंतर कांडला बंदरावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तटरक्षक दलाकडून समुद्रामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे.गुजरातमधील परिस्थिती बिघडू नये यासाठी सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

