बारामती : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची ‘ग्रँड एण्ट्री’ झाली.
‘सामना’तून पडळकरांना धडे देणे म्हणजे शशी थरूर यांनी ब्रह्मचर्याचे धडे देण्यासारखे…
दरम्यान, बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आज शहरातील भाजप कार्यालयासमोर एकत्र येत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणी देणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, सुधाकर पांढरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होते. गोपीचंद पडळकर, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या.
दुसरीकडे, धनगर समाजाकडून पडाळकर यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पडळकर यांच्या विधानावर आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्याने, प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असं यावेळी पडळकर समर्थकांनी नमूद केलं. पडळकरांच्या समर्थनात एकच छंद गोपीचंद, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. सांगलीमध्ये देखील गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालण्यात आला आहे.
बहुजनांच्या वाघाची १०० गाड्यांसह ‘ग्रँड एण्ट्री’, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
