🕒 1 min read
नागपूर : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली .
नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारित असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरणसुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या नामांतरावरून आता राजकारण पेटायला सुरवात झाली आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा केव्हाही व कधीही विरोध नाही. मात्र शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
गोंड, आदिवासी समाजाशी निगडित असल्याने या प्राणिसंग्रहालयास गोंडवना नाव देण्याची गोंड समाजाची मागणी होती व ती मान्यही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपा प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठका पार पडल्यावर रात्री पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘देवेंद्र फडणवीसजी तुम्ही कितीही प्रयत्न करा…आघाडीत बिघाडी काही होत नाही’
- वरिष्ठांच्या त्रासाला वैतागून बिडकीनच्या ग्रामसेवकाने घेतले विष
- ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारने वीजबिल वसुली सुरु- फडणवीस
- निवडणूक बिनविरोध करत मुळा कारखान्यावर पुन्हा गडाखांचीच सत्ता!
- प्रजासत्ताक दिनी राजपथावर घडणार महाराष्ट्राच्या संत परंपरेचं दर्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
