टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा लाभ काही निवडक जातींना होत असल्याचे कारण देत सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. न्या. रोहिणी आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन केले जाणार आहे. मात्र सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी ओबीसींचे तीन तुकडे करणे समाजासाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप केला आहे. देशातील ओबीसींची जनगणना झाली नसतानाही सरकार कोणत्या आकडेवारीच्या आधारे विभाजन करू पाहत आहे, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सरकारच्या निर्णया विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई येथे आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना आज सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत होत असलेला प्रकार येत्या काळामध्ये इतर आरक्षणाबाबत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.


