सोलापूर – सोलापुरात स्थानिक पालकमंत्री असता तर चित्र वेगळे दिसले असते. दोन पालकमंत्री बदलले. कोरोनासाठी तिसर्या पालकमंत्र्यांची नेमणूक केली. मात्र तरीही फरक पडला नाही. त्यामुळे त्यांचीही आता बदली करावी. दुसरीकडे एवढा हताश जिल्हाधिकारी आम्ही पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांचीही बदली करावी, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी म्हटले आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या दुसर्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारच्या वर्षभराच्या कार्याची माहिती देण्यासाठी काल लोकमंगल बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत आ. सुभाष देशमुख उपस्थित होते. यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सचिन कल्याणशेट्टी, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आणि प्रशासनाच्या अपयशाचा पाढाच वाचला.
दरम्यान, याच पत्रकार परिषदेत बोलताना आ. सुभाष देशमुख यांनी देखील सरकारवर तोफ डागली. राज्यात तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे अनागोंदी कारभार सुरू आहे. तशीच काहीशी स्थिती सोलापुरात आहेत. येथील तीन प्रमुख अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने बिकट परिस्थिती झाली आहे, अशी टीका माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केली आहे.
आ. देशमुख पुढे म्हणाले की, केंद्राने कोरोनासाठी राज्याला जवळपास 28 हजार 104 कोटी रूपये विविध स्वरूपात दिले आहेत. अजूनही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप मदत करण्यास तयार आहे. मात्र तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही. सोलापुरातही तशीच स्थिती आहे. येथील अधिकार्यांमध्ये ताळमेळ नाही. जिल्हाधिकारी एक आदेश काढतात तर पोलिस आयुक्त एक आदेश काढतात, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या दोघांसह पालिका आयुक्त, सिव्हीलचे वैद्यकीय अधीक्षकांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास शहराची परिस्थिती नक्की सुधारेल.
केंद्रातील सरकारबाबत बोलताना आ. देशमुख म्हणाले की, वर्षभरात कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी, राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू, नागरिकत्व सुधारणा कायदा यासह अनेक ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले आहेत. याशिवाय कोरोना काळात आत्मनिर्भर योजनेतून 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्याला कोरोनासाठी 28 हजार 104 कोटींची मदत केली आहे. या सरकारने जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
सोलापुरात सचिवस्तरावरील अधिकारी नेमा
सिव्हीलमध्ये अगोदरच 25 टक्के पदे रिक्त होती. तशाच आता कोरोना आला. त्यामुळे अनेक खासगी दवाखाने बंद झाले. त्यामुळे सिव्हीलवरचा ताण वाढला. त्यामुळे तेथील यंत्रणा विस्कळीत झाली आहे. सोलापुरात दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहेत. अधिकार्यात समन्वय नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे सोलापूरसाठी एक कायमस्वरूपी सचिवस्तरावरील अधिकारी नेमण्याची मागणी केल्याचे आ. देशमुख यांनी म्हटले.
द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध: आ. सुभाष देशमुख
महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी : आ. सुभाष देशमुखांची टीका

