मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षांत कमी करण्यात आलेल्या अध्यापन कालावधीचा विचार करून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमाचा भार कमी केला. मात्र, त्यासाठी अभ्यासक्रमातील ‘लोकशाही, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, फाळणीचा इतिहास’ हे घटक पूर्णपणे वगळले आहेत. सीबीएसईच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे.
यंदा सीबीएसईचे एप्रिलमध्ये सुरू होणारे शैक्षणिक वर्ष लांबल्यामुळे शैक्षणिक वर्षांतील नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्याअनुषंगाने सीबीएसईने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार ३० टक्क्य़ांनी कमी केला. मात्र, अभ्यासक्रमातील अनेक महत्वाचे घटक वगळल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. ‘लोकशाही, राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, नागरिकांचे अधिकार, मानव अधिकार असे काही घटक विविध विषयांतून पूर्णपणे किंवा काहीप्रमाणात वगळण्यात आले आहेत.
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. सीबीएसई अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, लोकशाही, विविधता हटवून केंद्रातील भाजप सरकार आपला अजेंडा राबवू पहात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
भाजपचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे, त्यांना लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला दूर करायची आहे म्हणूनच तरुण पिढीला हे शिकवू न देणे हाच त्यांच्यासमोर उत्तम मार्ग आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.आगामी काळात भाजपा वेगळ्या मार्गाने इतिहास पुन्हा लिहून अभ्यासक्रमात जोडू शकेल अशी भीतीही प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.
‘नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला’
‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते’

