टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.
या यात्रेत कारंजा येथे बोलताना धनंजय मुंडे यांनी ‘राजकीय भ्रष्टाचार करणारी भाजपसारखी दुसरी पार्टी नाही अशी जोरदार टीका भाजपवर केली. जनतेला शेततळी दिली ती याअगोदर कधी दिली गेली नाहीत म्हणून दिली असे मुख्यमंत्री सांगत होते परंतु ती सध्या गुप्त आहेत ती फक्त भाजपच्या पुण्यवान लोकांनाच दिसतात. जलयुक्त योजनेत मुरलेले पाणी फक्त भाजपच्या पुण्यवान लोकांच्या मुखात पडते असा जोरदार टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
तसेच पुढे बोलताना ‘वनमंत्री यांनी तर आगळीवेगळी योजना आणली ३३ कोटी वृक्षलागवड केली आणि आता ३८ कोटी वृक्षलागवड केली आहे अरे पण इतके वृक्ष कुठे लावले. त्यांना पाणी कुठुन मिळणार भाजपच्या विहिरीचे की जलयुक्त मधून मिळणार आहे असा प्रश्न विचारताना ‘जेव्हा सांगली, कोल्हापूर, सातारा पाण्यात होते. प्रशासन पोचले नव्हते. भाजपवाले पोचले नव्हते परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्ते यांनी पुरग्रस्तांना आधार दिला असंही धनंजय मुंडे म्हणाले.
तसेच त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मतांची भीक मागत फिरत होते मात्र त्याचवेळी जनता पाण्यात बुडाली होती. त्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू होती. लोक भुकेने व्याकूळ झाले होते. गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने फिरले आणि त्यांचे मंत्री सेल्फी काढत होते. यांना लाज वाटायला हवी असंही मुंडे म्हणाले.

