कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बंदोपाध्याय यांचं शनिवारी सकाळी कोरोनामुळे निधन झालं. असीम बंदोपाध्याय महिनाभरापासून कोरोनाने ग्रस्त होते. मात्र उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोविडच्या नियमांनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. कोलकात्यातील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तरीही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
असीम यांची तब्येत आज सकाळी अचानक खालावली होती. कोरोनामुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी देखील प्रचंड खालावली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं मेडिको सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची परिस्थिती प्रचंड गंभीर असल्याचं पाहायला मिळालं आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर तर कोरोनाची आकडेवारी राज्याच प्रचंड वेगाने वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता रोज समोर येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी ही 20 हजारांवर पोहोचली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा रोजचा आकडा 100 च्या वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे 13 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याबाबतचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही कोरोनाचा ससंर्ग कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तसंच राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचाही प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये बेड्सची संख्या वाढवून ती 30 हजार इतकी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासादायक! बीडमध्ये बाधीतांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा हाहाकार; १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
- तेलगाव कोविड केअर सेंटरचे काम अपूर्णच; महिना उलटला तरी कासव गतीने काम
- सलमानचा ‘राधे’ला आयएमडीबी वर मिळाली ‘एवढी’ रेटिंग
- कोरोनावर मात करणाऱ्या राजीव सातवांची तब्बेत पुन्हा खालावली…


