टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप-सेनेचा विधानसभेसाठीचा १३५-१३५ चा फॉर्मुला ठरलेला आहे. तर उर्वरित १८ जागा घटक पक्षांना मिळणार आहेत. अशातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर शिवसंग्राम पक्षाने दावा केला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहुल जगताप हे आमदार आहेत. यावेळी या मतदारसंघातून राहुल जगताप आणि भाजपचे बबनराव पाचपुते यांच्यातील लढत जवळपास निश्चित आहे. अशातच भाजप सेनेचा घटक पक्ष असलेल्या विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाने या जागेवर दावा केल्याने बबनराव पाचपुते यांना धक्का बसला आहे. जर युतीने ही जागा शिवसंग्रामला सोडल्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते हे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, शिवसंग्राम पक्षाने या जागेवर लढण्याची तयारीही केली आहे. अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या दिपाली सय्यद यांनी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

