मुंबई : अमरावतीमधील शिवसेना नेते अनंत गुढे आणि युवा नेते अभिजीत अडसूळ यांच्यात कलगीतुरा रंगला होता. गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केल्याचा आरोप करत गद्दार गुढे यांना मातोश्रीवर थारा देवू नका अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांनी केली होती.
या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले.


