टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. आधी कॉंग्रेस,मग राष्ट्रवादी,काल भाजपा आणि आज शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून खा.राजू शेट्टींविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने मैदानात उतरणार आहेत.
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसत असल्याने निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी निवेदिता माने आणि मुलगा धैर्यशील माने यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. धैर्यशील माने यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हातकणंगले मतदारसंघात झटका बसला आहे.
पहिल्यांदाच निवडणूक लढविणारे ३९ वर्षीय धैर्यशील माने हे राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र आहेत.आजोबा बाळासाहेब माने पाच वेळा खासदार होते. तर, निवेदिता माने यांनी दोनदा खासदारकी भुषवली आहे. निवेदीता माने या राष्ट्रवादी पक्षाच्या माजी राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुद्धा राहिल्या आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब माने हे पाचवेळा खासदार होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्षे काम पाहिलं आहे.


