औरंगाबाद : किरकोळ वादानंतर तीन आरोपीनी २७ वर्षीय तरुणाला भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास औरंगपुरा भागातील पिया मार्केट जवळ घडली. सीसीटीव्हीच्या मदतीने रात्री उशिरा सिटीचौक पोलिसांनी तीन संशयित आरोपिना अटक केली. समीर खान सिकंदर खान वय-२७ (रा.असेंफिया कॉलोनी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समीर हा औरंगपुरा भाजी मंडई जवळील पिया मार्कंट जवळ असलेल्या एका बिअरशॉपी जवळ मित्रांसह उभा होता. त्यावेळी तीनही आरोपी तेथे मद्यधुंद अवस्थेत आले, दरम्यान समीर व तिन्ही आरोपीमध्ये वाद झाला. तिन्ही आरोपीनी समीर जवळील पैसे हिसकावत होते. त्यावरून हा वाद झाला. मृताने तिघांना विरोध केल्याने संतापलेल्या आरोपींनी जवळील धारदार चाकूने मांडीत भोसकले, वार खोलपर्यंत असल्याने मोठा रक्तसाव सुरू झाला. दरम्यान समीर खाली कोसळल्याने पाहून तिन्ही आरोपींनी तिथून पळ काढला. सोबतच्या मित्राणे समीर यास घाटीत दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सिटी चौक पोलीसांनी रात्री उशिरा तिन्ही आरोपीस ताब्यात घेतले आहे.
घाटीत पोलिसांचा वाढीव बंदोबस्त तैनात
रात्री समीरची तिघांनी हत्या केल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली होती. त्याचे मित्र व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आज सकाळी शवविच्छेदन झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त घाटी रुग्णालय परिसरात वाढविण्यात आला होता.

