टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाने वेस्ट विंडीजला १२५ धावांनी हरवत विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या पराभवासह वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. या विजयासह टीम इंडिया अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजला विजयासाठी २६९ धावांचं लक्ष दिलं होतं. या लक्षाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला १४३ धावात गुंडाळण्यात भारताला यश मिळालं. भारतीय गोलंदाजीची धार यावेळीही पाहायला मिळाली. मोहम्मद शमीने फॉर्म कायम राखत ४ गाडी बाद केले, तर बुमराह आणि चहलने दोन फलंदाजांना माघारी धाडले. तसेच हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवनेही एक-एक गाडी बाद केला. वेस्ट इंडिजकडून सुनील अम्ब्रीज आणि निकोलस पुरण यांनी थोडाफार संघर्ष केला. परंतु ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली ७२ आणि महेंद्रसिंग धोनी ५६ यांचा फटकेबाजीमुळे २६८ धावांपर्यंत मजल मारली. लोकेश राहुल ४८ आणि हार्दिक पांड्यानेही ४६ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमर रोचने ३ तर होल्डरने २ गडी बाद केले. या विजयासह भारताने अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर पडली आहे.


