टीम महाराष्ट्र देशा : जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक सामन्यात नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २० हजार धावा पूर्ण करत इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विराटने ३७ वी धाव घेत त्याने हा पराक्रम केला.
जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीने क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने ४१७ व्या डावात २०,००० धावा पूर्ण केल्या. तर सचिन आणि लाराने ४५३ डावात २० हजार धावांचा टप्पा गाठला होता. तसेच २० हजार धावांपर्यंत पोहोचणारा विराट केवळ तिसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी २० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरातील खेळाडूंमध्ये हा पराक्रम करणारा विराट ७ वा खेळाडू ठरला.
दरम्यान, २०१९ च्या वर्ल्ड कपमधेही विराट शानदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत ३१६ धावा केल्या आहेत त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया अद्याप अपराजित आहे.

